छत्रपती संभाजी नगर, (सांजवार्ता ब्युरो) भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चित्तेपिंपळगाव उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि. २५) सकाळी घडली.
प्रतीक्षा गणेश ढगे (१८, रा. खोडेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिचे वडील गणेश रुस्तुम ढगे हे या अपघातात गंभीर जखमी झाले. प्रतीक्षा पांढरी पिंपळगाव येथील महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. क्रीडा आणि अभ्यासात प्रावीण्य मिळवलेल्या प्रतीक्षाने राज्यस्तरीय खो-खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. शनिवारी सकाळी ती स्पर्धा परीक्षेच्या (सीईटी) वर्गासाठी वडिलांसोबत दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, उड्डाणपुलावर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रतीक्षा ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून सुमारे २०० ते २५० फूट फरफटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, चिकलठाणा पोलिसांनी संबंधित ट्रक जप्त केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. सायंकाळी शोकाकुल वातावरणात खोडेगाव येथे प्रतीक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












